तळेगाव : तळेगांव दाभाडे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान घोरावडेश्वर पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पंचमवेद गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भोंडवे, क्षेत्र घोरावडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. मुकुंद राऊत आणि घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष राजेश मुऱ्हे यांनी दिली . दोन वर्ष कोरोना या जागतिक संकटामुळे या नाम यज्ञात दोन वर्ष खंड पडला होता. परंतु मागील वर्षीपासून पुन्हा मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे.
उत्सवाकरिता घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर परिसर स्वच्छता करण्यात आली असून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही राजेश मुऱ्हे यांनी सांगितले.
अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांकरिता भव्यमंडप व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवानिमित्त आयोजित सप्ताहात पहाटे ४:३० वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता गाथा पारायण, दुपारी १२ वाजता महिला भजन, दुपारी २ वाजता गाथा पारायण, सायं ५.३० वाजता हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन, ९ वाजता महाभोजन आणि रात्री १० नंतर भजन व हरिजागर असा नित्य. उपक्रम राबवण्यात येणार आहे.सप्ताहा दरम्यान रविवार दि १२ रोजी नाशिक येथील ह.भ.प. भगिरथ महाराज काळे, सोमवार दि१३ रोजी ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप,१४ रोजी ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे, १५ रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे, १६ रोजी ह.भ.प.नितीन महाराज काकडे, १७ रोजी भागवत एकादशीचे कीर्तन ह.भ.प. माधव महाराज घोटेकर शास्त्री, १८ रोजी महाशिवरात्रीचे कीर्तन ह.भ.प. बालाजी महाराज उगले आणि रविवार १९ फेब्रुवारी काल्याचे कीर्तन सिन्नर येथील ह.भ.प. किशोर महाराज खरात यांचे होईल.
श्रीक्षेत्र घोरावडेश्वरांच्या सानिध्यात सात दिवस चालणाऱ्या भक्तीमय नामयज्ञात व सप्ताह सोहळ्यात पंचक्रोशीतील भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी साप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




