पिंपरी- चिंचवडकरांची श्रद्धा व अस्मिता असणाऱ्या चिंचवडगावातील महान साधू मोरया गोसावी यांच्या चरणी नारळ अर्पण करून आणि श्रींची महाआरती करत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी प्रचारास सुरुवात केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व निरीक्षक मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारल्याचे दिसून आले. पक्षाचे झाडून सारे नेतेही यावेळी एकवटल्याचे दिसले. नंतर त्यांनी पदयात्रा काढली.
चिंचवड पोटनिवडणुकीतील आघाडी, युती आणि शिवसेना बंडखोर अपक्ष अशा तीन उमेदवारांनी पहिल्या रविवारी आज धडाक्यात प्रचार सुरु केला. त्यामुळे मतदारसंघच नाही, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात निवडणुकीचे वातावरण तयार झाले.

आघाडी तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी झाला. तर, उमेदवारी जाहीर झाली त्यादिवशीच प्रचार सुरु केलेल्या युतीतील भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. तिहेरी लढतीतील तिसरे शिवसेनेचे बंडखोर अपक्ष राहूल कलाटे यांनीही ते राहत असलेल्या वाकडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन तेथील ग्रामसभेतून आपला प्रचार सुरु केला.




