पिंपरी (प्रतिनिधी) चिंचवड मतदारसंघात निवडणूक काँटे की टक्कर नव्हे, काटेंशी टक्कर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जोरावर विठ्ठल उर्फ नाना काटे निवडून येणार आहेत. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे गद्दार टिकणार नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आघाडीचा मेळावा झाला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी या तीनही नेत्यांनी भाजप आणि राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ही पोटनिवडणूक म्हणजे काट्याची नाही,तर काटेंशी टक्कर आहे. तसेच राज्यातील गलिच्छ राजकारणाविरुद्धचा तो लढा आहे. राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे असा प्रश्न उपस्थित करतानाच या गद्दार सरकारला महाराष्ट्राला पुढे न्यायचेच नाही. या घटनाबाह्य गद्दार गॅंगवर उद्योजकांचा विश्वास न राहिल्याने ते बाहेर जात आहेत. हे उद्योग गुजरात व देशात इतरत्र गेल्याचे दुख नाही, तर राजकीय हेतूसाठी ते तिकडे पाठविले गेल्याचे दुख आहे असा हल्लाबोलही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
गद्दारांच्या सभेला खूर्चांची गर्दी…
राजीनामे देऊन माझ्या वरळी, मुंबई येथील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध लढण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्याने आता त्यांनी त्यांच्या ठाण्यातील मतदारसंघातून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवावी असे आव्हानही आदित्य यांनी यावेळी दिले. यावेळी आम्ही खोक्याला हात लावला नाही, पण चाळीस आमदार आणि १३ खासदारांनी तो लावला नसल्याचे अजून सांगितलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सभेतील गर्दीकडे बोट करीत आमच्या सभेला जनतेची गर्दी असते, तर घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सभेला ती खुर्च्यांची असते…असा खोचक टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला आहे.




