पिंपरी : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी आहे का? असा प्रश्न विचाण्यात आला. त्यावर अनेकांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. आता खुद्द शरद पवार यांनी यासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. ‘अजित पवारांना बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले को इशारा काफी है,’ असे पवार चिंचवड विधान सभेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले.
ते चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही पवार म्हणाले.
…तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?
तुम्हाला या शपथविधीबाबत माहित होते का? असाही प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला.
ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते
राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. आता मी ही काँग्रेसमधून बाहेर पडलो. मात्र मी असं काही केलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथं वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की, पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. अशावेळी ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे दिसतंय. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची शंका
निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची शंका आहे. आयोग कोणाच्या सांगण्यावरुन बोलतोय असा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचे शरद पवार म्हणाले. यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. जे झालं ते चुकीचं झालं असल्याचे पवार म्हणाले. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यामुळं सध्या मी न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य करू शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले. आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे.
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेचा शपथविधी
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 2019 साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन शपथ घेतली होती. परंतु अल्पवधीतच सरकार कोसळलं.




