पिंपरी: चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी दि.२६ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने कामकाजाचा तसेच मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र या ठिकाणी देण्यात येणा-या सोयीसुविधांचा आढावा आज निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी घेतला.
पोटनिवडणूकीच्या निवडणूक विषयक कामकाजाचे विविध टप्पे यशस्वीरित्या पार पडत असून सर्व कामकाज व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विविध प्रशिक्षण, बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज पोटनिवडणूकीसाठी नियुक्त सेक्टर अधिकारी, तसेच मतदान कामकाजाचे साहित्य वाटप आणि स्वीकृत करणा-या कर्मचा-यांसमवेत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय, थेरगांव येथील बापूजीबुवा सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा, टपाल कक्ष समन्वय अधिकारी राजेश आगळे, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड, नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांची उपस्थिती होती.
निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदान केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा, मतदान साहित्य, टेबल, खुर्च्या, इतर फर्निचर, विद्युत व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था आदींबाबत श्री. ढोले यांनी आढावा घेतला. एकाच जागी दोन मतदान केंद्र असल्यास तेथे योग्य दुभाजक व्यवस्था उभारताना आवश्यक सर्व काळजी घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम चोखपणे करावे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांशी सौजन्याने वागावे, मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याची खबरदारी घ्यावी, कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न उद्भवल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, अशा सूचना श्री. ढोले यांनी यावेळी दिल्या.




