पिंपरी : कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता दोन्ही मतदारसंघात प्रचार थांबला आहे.
सत्ताधारी भाजप यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी मधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला. त्यामुळे पोटनिवडणुकीत सहानुभूती विषय पूर्णपणे दुसऱ्याचा दिसून आला. एकतर्फी वाटणारी निवडणूक महा विकास आघाडीतील एकजुटीमुळे रंगतदार बनले आहे. भाजपला सोपी वाटणारी कसबा व चिंचवड मधील निवडणूक धोक्याची घंटा दिसत असल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन्हीही मतदारसंघात तळ ठोकून बसलेले दिसून आले. इतिहासात कधी नव्हे तर मुख्यमंत्री पोट निवडणुकीच्या माध्यमातून रोड शो करत असल्याचे दिसून आले.
कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात तगडी लढत आहे. त्याचप्रमाणे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात लढत बघायला मिळणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांनी मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात कोणतीही कसर सोडण्यात आली नाही. यामध्ये कोणताही पक्ष सोबत नसताना अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रचारात दोन्हीही नेत्यांचे टेन्शन वाढवले. त्यांना मिळणारे मतदान कोणासाठी फायदेशीर व कोणासाठी तोट्याचे ठरणार आहे हे निकालानंतर दिसून येणार आहे.




