पिंपरी: चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षासह सर्वच पाठिंबा देणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या व मतदार राजाच्या साथीने ताकदीने लढविली. विकासाच्या मुद्यावर आम्ही मतदारांना आवाहन केल्यामुळे मतदार ही मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे शहरात परिवर्तन घडविणार हे निश्चित आहे.
पोट निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. हा उत्साह आमचा आत्मविश्वास वाढविणारा आहे. त्यामुळे येणारी दोन तारीख ही आपलीच असेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी व्यक्त केला.
पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल शाळेतील मतदान केंद्रावर नाना काटे यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच इतर घटक पक्षांनी ही पोटनिवडणूक ताकदीने लढविली आहे. या मतदारसंघात तिरंगी नव्हे तर राष्ट्रवादी आणि भाजप अशीच थेट दुरंगी लढत झाली. विकासाचा मुद्यावर जनतेनेही आम्हाला साथ दिली आहे. आमचे नेते व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली, त्यामुळे चिंचवड विधानसभेत परिवर्तन अटळ असून आपला विजय निश्चित असल्योचही नाना काटे यावेळी म्हणाले.




