पिंपरी, दि. 10 (प्रतिनिधी) – चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना नियोजनासाठी आणि प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. असे असतानाही पदाधिकारी व कायर्र्कर्त्यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले. पुढील निवडणुकीच्या कामाला लागा आपला विजय नक्की असून नव्या जोमाने कामाला लागा, अशा शब्दात अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना नव्याने कामाला लागण्याचे आदेश दिले.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. ते बोलताना म्हणाले की, नाना यांनी कमी कालावधीत लाखाच्या आसपास मते मिळविली. २०१४ नंतर सामोरे गेलेल्या निवडणुकीत यावर्षी तब्बल 60 हजार अधिकचे मतदान मिळविण्यात पक्षाच्या व महाविकास आघाडीतील कायकर्त्यांना यश आले. या निवडणुकीत थोड्या फरकाने यशाने हुलकावणी दिली. अपक्ष उमेदवारामुळे महाविकास आघाडीतील मतांची विभागणी झाली. हे नाकारू शकत नाही. मात्र, भाजप विरोधात लाट असून पक्षाला पुढील निवडणुकीत नक्कीच यश मिळणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच कामाला लागा असे आदेश यावेळी त्यांना दिले.
यावेळी ज्येष्ठ नेते नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मा. नगसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजितदादांनी पोटनिवडणुकीत पडलेल्या मतदानाची प्रभागनिहाय व बुथनिहाय माहिती यावेळी घेतली. जय-पराजय हे निवडणुकीत होतच असतात. मात्र, आपलेल्या अत्यंत कमी वेळात मिळालेली मतदान ही आपली विश्वास द्विगुणीत करणारी आहेत. त्यामुळे खचून न जाता येणार्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टीने आतापासून तयारीला लागा असे म्हटले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आपण बैठक घेणार असून त्यावेळी पुढील निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. आपण राज्य शासन, महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या आतापासूनच सर्वांनी कामाला लागा. पुढील निवडणुकांमध्ये मतदार आपल्यालाच संधी देतील आणि आपला विजय होईल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी बोलून दाखविला.




