पिंपरी : मुंबईत गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा पाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे भाषण झाले त्यामुळे राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या वाकड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी होत असून वाकड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वाजीद रजाक सय्यद यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी काल मुंबईत भाषण केलं, या भाषणामुळं दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करा असं तक्रारीत नमूद केलं आहे.




