- मालमत्ता करातून 20 कोटी तर पाणीपट्टी करातून 7 कोटी रुपये तिजोरीत जमा
लोणावळा : कर वसुलीसाठी लोणावळा नगर परिषदेची धडक कारवाई सुरू असून 31 मार्च अखेर नगरपरिषदेच्या तिजोरीत मालमत्ता करातून 20 कोटी तर पाणीपट्टी करापट्टीतून 7 कोटी रुपये जमा झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक वसुली झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली आहे.
नागरिकांना सुलभतेने मालमत्ता व पाणीपट्टी कर भरता यावा याकरिता 31 मार्चपर्यंत शनिवार व रविवारसह सुट्यांच्या दिवशीदेखील लोणावळा नगर परिषद कार्यालय खुले ठेवण्यात आले होते. हे वर्ष लोणावळा नगर परिषदेचे करनिर्धारण वर्ष असल्याने नागरिकांकडून कर वसुलीकरिता जानेवारी ते मार्च असा जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी नगरपरिषदेला मिळाला होता, असे असताना देखील लोणावळा नगर परिषदेने उत्तम प्रकारे करवसुली केली आहे.
मालमत्ता करातून झालेली वसुली ही एकूण मागणीच्या 75 टक्के इतकी असून पाणी पट्टी कर हा एकूण मागणीच्या 75 टक्के इतका वसूल करण्यात आला आहे. कर वसुलीसाठी नगरपरिषदेकडून कर थकवणाऱ्या अनेक हॉटेल आणि खासगी मालमत्तांचे नळ कनेक्शन कट करण्यासारखी कारवाई करण्यात आले होती. यापुढेही ही कारवाई अशीच चालू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पंडित पाटील व कर निरीक्षक शिवाजी मेमाणे यांनी दिली आहे. उर्वरित थकीत करधारक नागरिकांनी लवकरात लवकर आपली थकीत कराची रक्कम पालिकेत जमा करावी असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
नव्या करनिर्धारणामुळे कराची रक्कम साधारण 20% पर्यंत वाढली असून अनेकजण कर भरणा न करता याबाबत तक्रारी करीत आहे. अनेक जण वेगवेगळी कारण देखील देत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत नगर परिषदेने कर वसुलीसाठी सक्ती केली नसल्याने कर भरणा अपेक्षेप्रमाणे झाला नव्हता, यामुळे वसुलीची रक्कम देखील वाढली आहे. नगर परिषदेकडून कर वसुलीसाठी वेगवेगळी पथक तयार करण्यात आली आहे. शिवाय कर भरण्यासाठी रोख भरणा, ऑनलाइन भरणा व धनादेशाद्वारे भरणा असे तिन्ही पर्याय नागरिकांसाठी खुले ठेवले आहेत.




