पुणे : पीएमपी कडून नवीन वेबसाइट आणि मोबाइल अॅप विकसित करण्यात येत आहे. या नवीन वेबसाइटवरून प्रवाशांना घरबसल्या अथवा कोठूनही प्रवास मार्गावरील तिकीट ऑनलाइन स्वरूपात काढता येणार आहे. वेबसाइटवर मार्गाची माहिती सोप्या व सर्वांना समजेल, अशा पद्धतीने दिली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या बसथांब्यावर पोहोचून किंवा बसमध्ये चढल्यावर तिकीट काढण्याऐवजी आधीच तिकीट काढून बस प्रवास करणे शक्य होणार आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ३७९ मार्गांवर सेवा दिली जाते. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला आहे. सध्याची पीएमपीची वेबसाइट प्रवाशांसाठी वापराच्या दृष्टीने अधिक सोयीची करण्यात येणार असून, त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
यावर नवीन प्रवाशांना मार्ग कळावेत, यासाठी साध्या व सोप्या पद्धतीने माहिती दिली जाणार आहे. प्रवाशांना वेबसाइटवरून प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुक करता येईल, अशी सोय केली जाणार आहे. प्रवाशांना प्रवासाच्या मार्गावर किती थांबे आहेत, ते कोणकोणते आहेत, त्या मार्गावर कोणत्या बस धावतात, त्यांच्या वेळा काय, अशी सर्व माहिती वेबसाइटवर दिसणार आहे.




