पिंपरी :- महापालिका प्रशासनाने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्तांवरील सामान्य करातील विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात महिलांच्या नावाने असलेल्या मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगाना ५० टक्के, तर माजी सैनिकांना शंभर टक्के सवलत लागू आहे. गतवर्षी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. नागरिकांना ३० जूनपर्यंत कर भरुन सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
शहरात पाच लाख ९७ हजार ७८५ मालमत्ता आहेत. त्यातून मागील आर्थिक वर्षात ८१७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. याच अनुषंगाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटींचा टप्पा गाठण्याचे उदिष्ट विभागाने ठेवले आहे. त्यासाठी सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरातील पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकरात-लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरण पूरक सवलतीचा एकत्रित लाभ घेता येईल.
आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी सामान्य करात पाच टक्के, फक्त महिलांचे नाव असलेल्या निवासी घरास ३० टक्के, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के, स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास ५० टक्के, ऑनलाइन पेमेंट गेट वे, आरटीजीएस, नेफ्टद्वारे भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना ३० जूनपर्यंत पाच टक्के तर जुलै ते सप्टेंबर अखेर पर्यंत भरणा करणाऱ्यांना चार टक्के सवलत मिळणार आहे.
कंपोस्टींग यंत्रणा, सांडपाणी प्रकल्प,झिरो वेस्ट संकल्पना राबविणा-या सोसायट्यांना पाच ते दहा टक्क्यांपर्यंत सवलत आहे. माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत स्वयंस्फुर्तीने मालमत्ता कराची आकारणी करणाऱ्यांसाठी सामान्य करात दोन टक्के सवलत संपूर्ण वर्षासाठी आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास व इतर वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यास वर्षासाठी करात दोन टक्के सवलत दिली जाते. प्रामाणिकपणे तीन वर्षे मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दोन टक्के ज्यादा सवलत आहे. संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात (सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणी पुरवठा लाभ कर, रस्ता करात) शंभर टक्के सवलत आहे. चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात पाच टक्के सवलत आहे.
मालमत्ताधारकांनी ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल २० टक्के सवलत मिळते. त्याचा नागरिकांनी फायदा घेतला पाहिजे. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करावा. –शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका…




