पुणे : पुणे- दोन राजकीय गटांत झालेल्या वादातून भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक आणि मोक्कातील आरोपी विवेक यादव याने लष्कर पोलीस ठाण्यात पिस्तूल काढत फिर्यादीला धमकावल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत. तर विवेक यादव याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दाखल झालेल्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलीसांकडून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. माजी नगरसेवक विवेक यादव (वय 40, रा. वानवडी), त्याचा भाऊ संतोष यादव (वय 25, रा. लुल्लानगर), सागर वैऱ्या (वय 20), पंकज जगताप (वय 35, रा. कुंभार बावडी), सुशील यादव (वय 35), शिवाजी ऊर्फ छत्या यांच्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमित नारायण मोरे (वय 28, रा. लष्कर) यांनी फिर्याद दिली आहे. तर यादव याच्या गटाकडून गणेश भुरेवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
यातील एका मित्राला संतोष यादव याने शस्त्राने मारहाण केली. हा प्रकार झाल्यावर फिर्यादी मोरे व त्यांचे सहकारी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले. तेथे काही वेळात संतोषचा भाऊ माजी नगरसेवक विवेक यादव हा साथीदारांसह आला. तेथे फिर्यादीला पाहताच पिस्तूल दाखवत तक्रार मागे घे, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी विवेक यादवने दिली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच तो मोरे याच्या अंगावर धाऊन गेला.
पोलिसांनी यादवला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बळाचा वापर करत पोलिसांच्या कामात अडथळा आणला. मिरवणूक असल्याने वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तात होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव करत आहेत.
अनेक गंभीर गुन्हे दाखल माजी नगरसेवक विवेक यादव याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाईत यादवला जामीन मिळाला आहे. यानंतरही यादवने पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन फिर्यादीला दमदाटी केली. तसेच पोलिसांवरही बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली आहे.




