पिंपरी :- वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे काम सुरू आहे. शनिवारी (दि. २९) सकाळी दहाच्या सुमारास उत्कर्ष चौकात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना वाकडला नॅचरल गॅस पुरवठा करणारी एमएनजीएलची मुख्य पाईपलाईन तुटली. गॅस पुरवठा खंडित झाल्याने तीनशे सोसायट्या व तीन हजार फ्लॅटधारकांना याचा फटका बसला आहे.
सकाळी दहाच्या सुमारास ही लाईन तुटली. त्यामुळे सकाळी ऑफिस, शाळा, कॉलेजला जाण्याच्या धावपळीत घरातील गॅस गुल झाल्याने अनेकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत वाकड मधील आयटी अभियंत्यांनी ट्विटरवर शेलक्या भाषेत आपला रोष व्यक्त करून रहिवाशांना वेठीस धरणाऱ्या निष्काळजी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रस्त्याचे काम करताना रस्त्याखाली असलेल्या सर्व सेवा वाहिन्यांची माहिती संबंधित ठेकेदाराला असतेच किंबहुना अधिकारी सर्व माहिती नकाशा त्याला देतात मग तरीही हा निष्काळजीपणा कसा केला जातो. रस्त्याची कामे करताना वीज लाईन तुटते, पाणी लाईन तुटते आता तर गॅस लाईनच डॅमेज केली गेली आहे. महापालिकेचे निष्काळजी अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.




