पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरापासून उन्हाचा पारा अधिक चढला होता. कडक उन्हाने हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना सायंकाळी पाच नंतर ढगाळ वातावरण तयार झाल्याने थोडा दिलासा मिळाला. साडे पाच वाजता भोसरीसह दिघी, चऱ्होली, मोशी चिखली या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला.
भोसरी परिसरातील एमआयडीसी भागातील कामगार सायंकाळी घरी जात असताना अचानक पाऊस आल्यामुळे कामगार वर्गाची तारांबळ उडाली. गारासह पडणाऱ्या पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत होते. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.
चिंचवड शहरातील काही भागांमध्ये वाऱ्यासह गारपीट झाली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक पावसाने नागरिकांना झोडपून काढले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. गारपीट झाल्यानंतर इमारतीच्या टेरेसवर काही नागरिक गारा गोळा करताना दिसले.
पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अद्याप मोसमी पाऊस येण्यासाठी अवधी आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली, वाऱ्यासह गारपीट झाली. रस्त्यांवर आणि इमारतीच्या टेरेसवरती गारा गोळ्या करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले. आज सकाळपासूनच पिंपरी- चिंचवड शहरात ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात बदल जाणवत होता. तीव्र उष्णतेपासून आज पिंपरी-चिंचवडकारांची काहीशी सुटका झाल्याचे चित्र आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

आज आलेल्या पाऊस व वादळामुळे प्राधिकरण येथील गोकुळ स्वीट्सच्या बाजूला से. न. 24 प्लॉट नं. 375 फळाच्या स्टॉलवर मोठे झाड पडले. त्याखाली दोन जण नवरा व बायको सुखरूप वाचले. तसेच ज्ञानप्रबोधिनी स्कूलच्या बाजूला गाडीवर झाड पडले.




