पुणे : मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. तर चिंचवड येथील कार्यक्रमात लोकसभा निवडणुकी पुन्हा लढवण्यावर कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिरूर लोकसभेसाठी नव्या उमेदवाराचा शोध सुरू होता. मुंबई व आज पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिरूर लोकसभेसाठी पुन्हा अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे 2019 मध्ये आणि आगामी लोकसभेसाठी इच्छुक असणारे भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या नावाची चर्चा न झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी च्या आशेवर पाणी फिरले आहे. लांडे यांनी १ जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. भावी खासदार… अशा आशयाचे फ्लेक्सबाजी केली. पण सर्वच काही फ्लेक्स वरतीच राहिले अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
शिरुरच्या उमेदवारीबाबत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निर्णय घेतील. पण, पक्षाने संधी दिल्यास ही निवडणूक लढवणार आणि जिंकणारसुद्धा…’’ असा दावा जाहीरपणे माजी आमदार विलास लांडे यांनी केला होता. तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि ते बांधतील तेच तोरण, इतरांनी अकारण चर्चा करु नये असे कोल्हे यांनी म्हंटले होते. त्यामुळे शिरुरच्या जागेवरुन कुणाला संधी मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
पुण्यात झालेल्या बैठकीत मंचर, आंबेगाव व जुन्नर भागातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट संसदपटू राहिलेले विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना संधी देण्याबाबत जोरदार प्रयत्न केले. अजितदादांनी याबाबत कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. रोखठोक भाषेत अमोल कोल्हे यांनाही आपण निवडणूक लढवणार आहात का? दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा कानावर आली याबाबत थेट प्रश्न विचारला. यावरती बोलताना अमोल कोल्हे यांनी इतर पक्षात जाण्याच्या बातम्या माध्यमाने पेरले आहेत मी कोणत्याही पक्षात जाणार नाही पक्षाने संधी दिली तर मी पुन्हा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहे असे सांगितले. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेतील जिव्हाळ्याचे तीनही प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान हे त्यांनी व्यक्त केले. यामध्ये पुणे नाशिक महामार्ग, बैलगाडा शर्यत व नाशिक रेल्वे प्रकल्प यामधील दोन प्रश्न निकाली निघाले तर रेल्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे.
लांडे समर्थकांमध्ये पदरी निराशा …
विधानसभा 2014 च्या निवडणुकीपासून विलास लांडे यांना ‘राष्ट्रवादी पासून हळूहळू बाजूला होताना दिसत आहेत. 2019 लोकसभेच्या वेळी ही इच्छुक असताना नवीन लोकप्रिय चेहरा म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली व ते निवडूनही आले त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विलास लांडे यांनी निवडणूक न लढवता अपक्ष उमेदवारी घेत निवडणूक लढवली. त्यातही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष बदलाच्या वेळी लांडे समर्थकांना शहराध्यक्ष पद विलास लांडे यांना मिळावे अशी बांधणी केली. मात्र, अजित पवार यांनी त्यांचे शिष्य अजित गव्हाणे यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून विलास लांडे यांना बाजूला केले. विधान परिषद निवडणुकीतही लांडे यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरुन अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात एखाद्या चांगल्या मंडळावर संधी मिळण्याची अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाकडून संधी दिली जाईल, असा दावा केला जात होता. मात्र, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून लांडे यांचा अपेक्षाभंग झाला आहे.




