चांदखेड: ‘विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी’चा जयघोष करत चांदखेड (ता. मावळ) येथील पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अनोख्या दिंडीचे नियोजन करण्यात आले होते. ही दिंडी होती न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची होती. आषाढी वारीनिमित्त या दिंडीचे आयोजन केले होते.

सजवलेल्या पालखीसह वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनींसह केलेला पालखी सोहळा चांदखेड व परिसरातील भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच पालखीतील रिंगण सोहळ्याने उपस्थितांना पंढरीचे दर्शन घडविले. पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची आस पायी जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच शाळांमध्ये शिकत असलेल्या बालचमूंनाही लागली असल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी, वारीचा अनुभव मात्र मुलांना घेता यावा, यासाठी चांदखेड (ता. मावळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये ज्येष्ठ अध्यापक सत्यवान पवार, वीरेंद्रप्रसाद जाधव, पांडुरंग खांडवी, सदाशिव मधवे ,सरला भोये, तृप्ती विरणक, तरुणा सुपे, माधवी फापाळे, सुकेशनी लोंढे,निलेश आवारी, अनुजा गोपने, वैशाली पवार, विलास गायकवाड इत्यादी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यालयातील ५९५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शाळेच्या प्रांगणात पालखीचे पूजन केल्यानंतर विठ्ठलनामाच्या गजरासह गावात प्रभात फेरी काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकही तल्लीन झाल्याने पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस थोरांसह चिमुकल्यांनाही लागली होती. पालखी मिरवणुकीनंतर विद्यालयाच्या वतीने पालखीचे स्वागत, आरतीनंतर अश्वरिंगणास सुरुवात झाली होती. बालवारकऱ्यांनी पालखी सोहळ्यासह दिंडीमधील घोड्याच्या रिंगण सोहळ्यात विविध खेळ, शिक्षिकांसह विद्यार्थिनींनी फुगडी खेळत एक वेगळाच रंग भरला. चिमुकल्या वारकऱ्यांचे आकर्षण होते. कोणी विठ्ठल-रखुमाई तर कोणी संत ज्ञानेश्वरांसह वारकऱ्यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. वारकऱ्यांचा वेष परिधान केलेले विद्यार्थी, नऊवारी साड्या नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, पाना-फुलांनी सजविलेल्या पालखीच्या पुढे-मागे भगव्या पताका, गळ्यात टाळ, कपाळी गंध, भजनात दंग झालेले चिमुकले वारकरी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते.




