तळेगाव : मावळात मित्रांसोबत वर्षाविहारासाठी आलेला नगरमधील तरुण बुडाल्याचा घटना कुंडमाळ परिसरात घडली. पाण्यात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. ओंकार बाळासाहेब गायकवाड (वय २४, मूळ रा. अहमदनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार आणि त्याचे मित्र मावळातील कुंडमाळ परिसरात वर्षाविहारासाठी आले होते.
बंधाऱ्यावरुन ओंकार निघाला होता. पावसामुळे बंधारा निसरडा झाला आहे. पाय घसरुन ओंकार पाण्यात पडला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तो वाहून गेला. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. ओंकार वाहून गेल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने शोधमोहीम राबविली. ओंकार सापडला नाही.
दुर्घटना घडण्यापूर्वी ओंकाराने मोबाइलवर छायाचित्रे काढली होती. मित्रांबरोबर पाण्यात खेळताना ओंकाराने मोबाइलवर चित्रफीत तयार केली होती. कुंडमाळ परिसरात वर्षाविहारासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरवर्षी या भागात दुर्घटना घडतात. पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे फलक लावण्यात आले आहेत. पर्यटक सुरक्षाविषयक सूचनांकडे काणाडोळा करतात. पाण्याचा वेग जास्त असल्याने दुर्घटना घडतात, असे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांनी सांगितले.




