
पिंपरी- चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या शहराध्यक्ष पदाच्या निवडीला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण होऊ शकते असं म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
अमोल थोरात यांना भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं असून, घर म्हटलं की नाराजी येते, जर कोणी नाराज असेल तर लहान भाऊ, मित्र म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याशी चर्चा करून सर्वसमावेश काम करू असं शंकर जगताप यांनी म्हटलं आहे.
भाजपाचे विद्यमान आमदार तथा मावळते शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपल्याने शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्त केलं आहे. परंतु, या निवडीवरून आता पिंपरी-चिंचवड भाजपच्या स्थानिक राजकारणात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त करत एकाच परिवारात दोन पदे का? असा प्रश्न विचारला आहे. जगताप कुटुंबाला झुकते माप का? यातून परिवार वाद दिसून येतो असं म्हणत त्यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.




