पुणे : मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (बु) येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी संथ होत असून अवजड वाहनांची संख्या मोठी आणि रस्ता अरुंद असल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे सातारकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक १० ते १२ किलोमीटर पर्यंत झाली होती.
नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहतूक ठप्प होऊन रांगा लागल्या होत्या. हे अंतर १२ ते १४ किलोमीटरचे आहे. या अंतरासाठी अवजड वाहनांना पाच ते सहा तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.या वाहतूक कोंडीचा परिणाम वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव, कात्रज, भारती विद्यापीठ परिसरातील अंतर्गत वाहतूकीवर झाला होता. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
शिरवळ परिसरातून येणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी कात्रज बोगद्यापर्यंत प्रवास केल्यानंतर वाहतूक कोंडी पाहून शहरात चालत येणे पसंत केले. पुढील वाहतूक कोंडीचा अंदाज आल्यानंतर अनेक वाहनचालक जुन्या कात्रज बोगद्यामार्गे पुणे शहरात येण्याचा पर्याय निवडत होते. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे नवले पुलाखालीही मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्याच्या लांबच लांब रांगा कात्रज-नवलेपुल रस्त्यावर लागल्या होत्या.



