पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी आळंदी रोडवर भरधाव मोटारीने काहीजणांना उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. संतापजनक बाब म्हणजे सात वर्षीय पार्थ प्रणव भोसले याला ७०० ते ८०० मीटरपर्यंत मोटारचालकाने फरफटत नेले.
याप्रकरणी दिघी पोलिसांनी राहुल तापकीर वय- ४० वर्षे याला ताब्यात घेतलं आहे. पार्थ आणि त्याची आई हे स्कुटीवरून चऱ्होली चौकातून दिघीच्या दिशेने जात होते. तेव्हा, भरधाव वाहनाने त्यांना भीषण धडक दिली. यात आई गंभीर जखमी झाली असून मुलगा पार्थचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेला पार्थ आणि त्याची आई स्कुटीवरून सर्व्हिस रोडने चऱ्होली चौकातून दिघीच्या दिशेने जात होते. तेव्हा, आरोपी राहुल तापकीर याने भरधाव मोटारीने त्यांना उडवले यात पार्थची आई खाली पडली तर पार्थ हा मोटारीच्या खाली अडकला गेला. त्याला ७०० ते ८०० मीटर फरफटत नेलं. पार्थचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. दरम्यान, संतापलेल्या नागरिकांनी मद्यधुंद असलेल्या राहुल तापकीर याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला दिघी पोलिसांच्या स्वाधीन केल आहे.




