वाकड : तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत ‘मी इथला भाई आहे मला विचारल्याशिवाय तू एसआरएचा फॉर्म भरायचा नाही’ असे म्हणत बेदम मारहाण केली. तसेच जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 12) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास काळा खडक, वाकड येथे घडली.
संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय 32, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड (Wakad ) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह गणेश डोंगरे (रा. गणेश नगर, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित कुमार मदाळे (वय 23, रा. काळा खडक थेरगाव. मूळ रा. कर्नाटक) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास फिर्यादी जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेत त्यांना ‘तू एसआरएचा फॉर्म भरला का? मी इथला भाई आहे, मला विचारल्याशिवाय तू एसआरएचा फॉर्म भरायचा नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.




