पिंपरी : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि राज्यातील महायुती सत्तेत सामील होऊन पुन्हा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादांचा पावणेदोन महिन्यांनंतर हा दौरा आहे. नव्या राजकीय समीकरणानंतर ते यावेळी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय नवा आदेश देतात, याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमासाठी 6 ऑगस्टला ते उद्योगनगरीत तेवढ्यापुरते आले होते. ती त्यांची धावती भेट होती. शहराचा खास दौरा नव्हता. उद्याची अधिकृत पहिली शहर भेट असल्याने त्यांच्या स्वागताची राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. मुंबईहून बाय रोड येणाऱ्या अजितदादांचे सकाळी नऊ वाजता शहरात प्रवेश करताना मुकाई चौक, रावेत, चिंचवडगाव व मोरवाडी चौकात स्वागत केले जाणार आहे.
त्यानंतर ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाऊन आढावा बैठक घेतील. पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्या कारभारावर शहरातील राष्ट्रवादी नाराज असून ती त्यांनी अजित पवारांपर्यंत यापूर्वीच पोचवली आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत ते पालिका प्रशासनाला आपल्या पद्धतीने समजावून सांगतील, अशी चर्चा आहे.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारसोबत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानंतर पिंपरी महापालिकेची आगामी निव़डणूक एकत्र लढणार आहेत.त्यासाठी ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय नवा आदेश चिंचवडच्या मेळाव्यात देतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. हा मेळावा प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी २ वाजता होणार आहे.




