पिंपरी : शहरातील बीआरटी मार्गांत खासगी वाहने घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरातील चार बीआरटी मागांत घुसखोरी करणाऱ्या तब्बल ४४,९८६ वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांनी ३ कोटी १० लाख ४१ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
नागरिकांना जलद वाहतूक सेवा देता यावी म्हणून पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहर हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सात बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग सुरू केले आहेत. यातील पिंपरी- चिंचवड हद्दीत चार आणि पुणे हद्दीत तीन बीआरटी मार्ग आहेत. यातून दिवसाला ७५० ते ८०० बस धावतात. त्या माध्यमातून दिवसाला तीन ते चार लाख प्रवासी प्रवास करतात; पण बीआरटी मार्गात बऱ्याच वेळा खासगी वाहनांची घुसखोरी होते. त्यामुळे पीएमपी बसला अडथळा निर्माण होतो. अपघात होऊन काहींचा जीव गेला आहे.
बीआरटी मार्गातील घुसखोरी रोखण्यासाठी वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने १ जानेवारी ते ३० ऑगस्टदरम्यान अशा ४४ हजार ९८६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या वाहन चालकांकडून ३ कोटी १० लाख ४१ हजार रुपये दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.
• शहरातील बीआरटी मार्ग
दापोडी ते निगडी, औंध-रावेत रोड (सांगवी ते किवळे), नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता
- जानेवारी कारवाई ४५३२ दंड २९४५५००
- फेब्रुवारी – ७४२६ – ४६१८५००
- मार्च – ६७३९ – ४४२०५००
- एप्रिल – ५८७८ – ४०३४५००
- मे – ५१८२ – ३६६६०००
- जून – ४९८६ – ३६२३५००
- जुलै – ४६६६ – ३५०१०००
- ऑगस्ट – ५५७७ – ४२३१५००
बीआरटी मार्गातून खासगी वाहने चालविल्यास सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या वाहनचालकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे.
• विठ्ठल कुबडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग




