- संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू ; अजित पवार
पिंपरी :- त्रिवेणीनगर, तळवडे भागात वाहतूक समस्येला स्थानिक नागरिक व वाहनचालकांना दररोज सामोरे जावे लागत आहे. पिंपरी चिंचवड शहर व चाकण MIDC ला जोडणारा तळवडे निगडी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर ४० फुट व त्यापेक्षा लांबीची वाहने व कंटेनर यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे ३ किमीच्या प्रवासाकरीता कधी कधी २ ते ३ तास वाहतुक कोंडी होत असते. यासाठी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत भक्तीच शक्ती चौक ते तळवडे आयटी पार्क चौक असा बाह्य वळण रस्तासाठी काही जागा संरक्षण विभागाकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांनी केली आहे.

चाकण, म्हाळुंगे MIDC. तळवडे आयटी पार्क तसेच देहू, निघोजे या परिसरातुन पिंपरी चिंचवड शहरात याच रस्त्याने अवजड वाहतुक होत असते. तसेच या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने वारंवार अपघात होत असतात. तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर, ज्योतीबानगर व गणेशनगर येथील रहिवाशांना वाहतुक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील नागरीक, तळवडे ग्रामस्थ, औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध होण्याकरीता वारंवार मागणी करीत आहेत. दिवसे दिवस वाहतुक कोंडी नित्याची झालेली आहे.
यासाठी तळवडे ते निगडी या रस्त्याला समांतर तळवडे आयटी पार्क चौक ते भक्ती-शक्ती चौक असा पर्यायी रस्ता विकसित करणे काळाची गरज आहे. पिंपरी चिंचवड मनपा-तळवडे गावच्या नियोजित विकास आराखड्यामध्ये काही भागात हा रस्ता नियोजित आहे. तथापि, संपूर्ण रस्ता विकसित करण्याकरीता देहू अॅम्युनिशन डेपोच्या सीमेवरील काही जागेची आवश्यकता लागणार आहे. तसेच सदर ठिकाणी कोणतेही विकास काम होणार नसून केवळ पर्यायी वाहतुकीकरीता रस्त्याचे काम होणार असल्याने देहू अॅम्युनिशन डेपोशी समन्वय करून पर्यायी रस्ता व्हावा. हा पर्यायी रस्ता झाल्यास वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील औद्योगिकीकरणास यामुळे चालना मिळणार असुन अवजड वाहतुक सुरळीत झाल्यास संपुर्ण शहरास त्याचा फायदा होऊन वायुप्रदुषण कमी होणार आहे. त्यामुळे तळवडे आयटी पार्क ते भक्ती शक्ती चौक निगडी असा DP Plan च्या नकाशानुसार पर्यायी रस्ता विकसित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी पंकज भालेकर व तळवडे ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यावर अजितदादांनी संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड आयुक्त यांची लवकरच बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.




