पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम असताना राज्य शासनाने ईद -ए मिलाद ची सुट्टी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर ऐवजी शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केली. त्यामुळे अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द झाली. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. २८) कार्यालयात हजर राहावे लागणार होते. या सर्व पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
विभागीय आयुक्तांच्या या आदेशामुळे उद्या (दि. २८) सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये तसेच | शाळा-महाविद्यालये यांना सुट्टी मिळाली आहे. राज्य शासनाने बुधवारी एक अधिसूचना प्रसिद्ध केली असून यामध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी गुरुवार दि. २८ सप्टेंबरऐवजी शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केली. शासनाने ही अधिसूचना काढल्याने अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द झाली. अनंत चतुर्दशी गुरुवारी असून या दिवशी नागरिकांना घरगुती गणपतीचे विसर्जन, सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करायचे आहे. तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र, शासनाने गुरुवारी ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द करून ती सुद्री शुक्रवारी दिल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे उद्या (दि. २८) शासकीय कार्यालयात उपस्थित राहावे लागणार होते.
त्यानुसार सर्व कार्यालयांनी शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याच्या तोंडी सूचना दिल्या. तर काही कार्यालयांनी कार्यालये सुरू ठेवण्याचे परिपत्रक काढले. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनंत चतुर्दशी असल्याने सर्वत्र सार्वजनिक गणेशमूतींची मोठी मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे दरवर्षी अनंत चतुर्दशीला स्थानिक सुट्टी | जाहीर करण्यात येते. या सर्व पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त यांनी गुरुवारी (दि. २८) स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान गुरुवारी (दि. २८) अनंत चतुर्दशीची सुट्टी. शुक्रवारी (दि. २९) इंद-ए-मिलाफची सुट्टी, शनिवारी (दि. ३०), रविवारी (दि. १) शासकीय सुट्टी आणि सोमवारी (दि. २) महात्मा गांधी जयंती निमित्त शासकीय सुट्टी, अशा सलग पाच दिवस शासकीय सुट्टी मिळणार आहे.




