पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कलहा नंतर अजित पवार यांचा गट राज्यातील सत्तेत सहभागी झाला. जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शवत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार गटाकडून आपल्या जुन्या खेळाडूंची संपर्क साधण्याचे काम हळूहळू सुरू आहे यामधील आज माजी महापौर आझम पानसरे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतल्याने पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह शरद पवार अथवा अजित पवार गटाला मिळणार याबाबत राजकीय धमासन सुरू आहे. नुकतेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदी पुन्हा अजित पवार यांची वर्णी लागली असताना पिंपरी चिंचवड शहरातील मोठा नेता शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटले आहे. यावेळी शरद पवार गटाची शहराध्यक्ष तुषार कामठे हेही उपस्थित होते.




