पिंपरी : टँकरमधून अवैधरित्या गॅस काढत असताना सिलेंडरचे मोठे स्फोट झाले. सलग तीन ते चार स्फोट झाल्याने परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक रस्त्यावर आले. या स्फोटामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट उठले. यामध्ये टेम्पोसह तीन स्कूल बस जळून खाक झाल्या. मुंबई- बंगळूरु महामार्गावर ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ रविवारी (दि. ८) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेएसपीएम महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत काहीजण टँकरमधून सिलेंडरमध्ये गॅस काढून घेत होते. त्यावेळी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसने पेट घेतला. तसेच, टेम्पोही जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच
अग्रिशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही तासात जवनांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे, पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सोसायट्या हादरल्या
सिलेंडरचा स्फोट इतका भयानक होता की, एक किलोमीटर परिसरातील सोसायट्यांना हादरा बसला. त्यामुळे भेदरलेल्या लहान मुलांसह नागरिक रस्त्यावर आले. घटनास्थळाच्या शेजारीच रात्रभर चालणारे एक हॉटेल आहे. टँकर चालक जेवणाच्या बहाण्याने त्या हॉटेलमध्ये थांबत होता. दरम्यान संगनमताने गॅस चोरी केली जात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. स्फोट झाल्यानंतर टँकर चालक, गॅसचोरी करणारे घटनास्थळावरून फरार झाले आहेत.




