मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक नाही. पक्ष सांगेल त्याचे आम्ही काम करणार असल्याचे पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी स्पष्ट केले.
मावळ लोकसभा प्रवास दौरा, घर चलो अभियानाच्या निमित्ताने (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी शहर दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष जगताप बोलत होते.
यावेळी आमदार आश्विनी जगताप, उमा खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस नामदेव ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे आदी उपस्थित होते.
मात्र, युतीमध्ये मावळ मतदार संघ शिवसेनेकडे असला तरी मावळच्या उमेदवाराबाबत युतीतील पक्ष ठरवतील. पक्ष सांगेल त्याचे आम्ही काम करणार असल्याचे सांगत आपण लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे सांगत जगताप म्हणाले,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतील भाजपा वॉरियर्स शी संवाद साधणार आहेत. यानंतर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या 9 वर्षातील लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.