पिंपरी :- भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार २०७ भोसरी विधानसभा मतदार संघात मतदार यादीच्या पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सर्व साधारण मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबरपासुन सुरुवात झाली असून तो येत्या ०९ डिसेंबर २०२३ पर्यत सरु राहणार आहे. या कालावधीमध्ये नागरीकांकडून दावे व हरकती म्हणजेच नवीन मतदार नोंदणीचे तसेच मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलाची दुरुस्ती अथवा मयत मतदार वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमात अधिकाधिक नागरीकांनी त्यांची मतदार नोंदणी अथवा दुरूस्ती करुन घेण्यासाठी दिनांक ०४ व ०५ नोव्हेंबर २०२३ (शनिवार व रविवार) तसेच २५ व २६ नोव्हेंबर २०२३ (शनिवार व रविवार) या चार दिवशी २०७ भोसरी मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर संपर्क करावा. त्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO सुटटीच्या दिवशी देखील उपस्थित राहून आपले कामकाज करणार आहेत.
या विशेष शिबीरात नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा तसेच जास्तीत जास्त नवमतदार, महिला, दिव्यांग, भटके विमुक्त, तृतीय पंथी मतदार, या सर्वाची देखील नाव नोंदणी होईल. २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरीकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी २०७ भोसरी विधानसभा मतदार संघ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.




