पिंपरी : दिवाळीचा सण तोंडावर असल्यामुळे सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू आहे. त्यातच सायंकाळची वेळ… खरेदीचा उत्साह आणि नागरिकांचे वाहनांच्या पार्किंगची समस्या यामुळे मोरवाडी चौक, पिंपरी सायंकाळी गर्दीने फुलून जातो. याच चौकातच असणाऱ्या मूळचंद कपड्याच्या दालनामुळे नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. मात्र, या दुकानासमोर पार्किंगची मोठी समस्या असल्यामुळे दुचाकीने संपूर्ण फुटपाथ पार्किंग साठी वापरला जातो. तर चार चाकी व रिक्षा चालकांनी थेट पुणे मुंबई महामार्गावर वाहने पार्किंग करताना दिसत आहेत.

पिंपरी चौकातील आंबेडकर चौकातील वाहतुकीचा ताण काहीसा कमी झाला आहे तर फिनोलेक्स चौक मोरवाडी येथे बस थांबा, मेट्रो स्थानक आणि चार बाजूंना जाणारा चौक यामुळे नेहमी वर्दळ असते. एरवी या चौकात बीआरटी मार्गातून एखादा वाहन चालक अगदी दुचाकी स्वार जरी आला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करताना पोलीस दिसतात मात्र मूळचंद दुकानासमोर फुटपाथ वरती बेकायदेशीर पार्किंग करणारे दुचाकी स्वार आणि रिक्षाचालक व चारचाकी वाहने यांच्याकडे मात्र पोलीस अधिकारी कानाडोळा करताना दिसून येत आहेत. त्यामुळे या चौकात सायंकाळी पाच ते आठ या गर्दीच्या वेळेत लोकांना वाहने चालवताना खूप त्रास सहन करावा लागतो. तर पादचारी नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते.
अशावेळी सामान्य नागरिकांसाठी व दळणवळण सुलभ व्हावे यासाठी पोलीस प्रशासन नेहमी तत्पर असते मात्र या चौकात डोळ्यासमोर अगदी पुणे मुंबई महामार्गावरती आणि मोरवाडीतून जुन्या कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती चार चाकी वाहने बिनधास्त पार्किंग करताना दिसत आहेत. याचा नाही त्रास सामान्य नागरिकांना होताना दिसत असतानाही पोलीस प्रशासन डोळ्यावरती पट्टी बांधून गप्प का राहते याचं गुपित सामान्य नागरिकांना पडले आहे. यातून कोणाची दिवाळी साजरी होणार आहे असा सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला जात आहे.




