पिंपरी दि. ०६ नोव्हेंबर :- दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यासाठी फटाका विक्रीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये असंख्य बेकायदेशीर स्टॉल उभे झाले आहेत. दरवर्षी शेकडो स्टॉल परवानगी न घेताच उभारले जातात. महापालिकेची परवानगी घेऊनच स्टॉल उभारावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहेत. परंतु नुसते आवाहन न करता या स्टॉलचे फोटो काढून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. मुळातच मोठया आवाजाचे, जास्त धूर व प्रदूषण करणारे, ध्वनीप्रदूषण करणारे व सुरक्षेला धोका असणारे फटाके यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी, अशी मागणी अॅड. सचिन गोडांबे यांनी केली आहे.
अग्निशामक विभागाने एक हजार रूपये परवानगी शुल्क आकारून ६० फटाका स्टॉलधारकांना 3 नोव्हेंबर पर्यंत परवानगी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात शेकडो स्टॉल उभे झाले आहेत. व्यावसायिकांनी फटका स्टॉल उभारण्यापूर्वी महापालिकेची रितसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे असे आवाहन अग्रिशामक दलाने केले आहे. परंतु बेकायदेशीर स्टॉलवर कारवाई कधीच केली जात नाही.
आगीसारख्या वा इतर भीषण घटना, भाजणे व अपघात इ. घडू नये म्हणून परवानगी घेऊन व केवळ नागरी वस्तीपासून थोडे दूर मोकळ्या मैदानावर असे स्टॉल उभारण्यास परवानगी द्यावी. महापालिकेच्या अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून शुल्क आकारून परवानगी देण्यात येत आहे. परंतु प्रत्येक रस्त्यावर बेकायदेशीर पणे स्टॉल उभारले गेले आहेत ज्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी, फटाका स्टॉल परिसरात, बिडी, सिगारेट पेटवू नये, स्टॉल परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवू नये, फटाका स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे, 1 ते 5 हजार लिटर पाण्याची व्यवस्था ठेवावी, अशी काळजी घेतलेली दिसत नाही, असेही गोडांबे यांनी म्हटले आहे.




