पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड पुणे व सेंट्रल पोलुशन कंट्रोल बोर्ड याच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे सुरज गजानन बाबर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांच्या प्रदूषणाबाबत पाठपुरावा करत आहोत. परंतु अजूनही केजुबाई बंधारा थेरगाव येथील प्रदूषण पाहता अजूनही नद्यांचे प्रदूषण होतच आहे हे सिद्ध होते. यावरून महानगरपालिकेला प्रदूषणाबाबत किती गांभीर्य आहे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड नियंत्रण ठेवण्यात किती यशस्वी होतं हे दिसून येत आहे.
महानगरपालिका वर्षानुवर्ष जलपर्णी काढण्यामागे व कंत्राटदार यांना ठेके देण्यामागे व्यस्त आहेत. परंतु जलपर्णी कशामुळे वाढते यांची कारणे कोणीही शोधत नाही. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड पुणे व सेंट्रल पोलुशन कंट्रोल बोर्ड यावर फौजदारी खटला दाखल करावा अशी मागणी सुरज बाबर यांनी केली आहे




