पिंपरी (प्रतिनिधी) निगडी ते तळवडे मार्गावर आणि मोशी-चिखली-तळवडे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे तळवडे एमआयडीसी व आयटी पार्कमधील नोकरदार, कामगार तसेच त्रिवेणीनगर, तळवडे, रुपीनगर आदी परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. परंतु महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाच्या नाकर्तेपणामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना अक्षरशः जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली आणि तळवडे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यातून डीपी मार्ग विकसित करण्याचा निर्णय झाला. परंतु ही बैठक होऊन काही महिने उलटले तरी अद्याप कामाला गती मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे निगडी-तळवडे आणि मोशी चिखली तळवडे मार्गावरील वाहतूक कोंडी वाढत आहे. महापालिका प्रशासनाने येथील जमीन लवकरात लवकर संपादन करून पर्यायी मार्ग तयार केल्यास या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

अग्निशामक, रुग्णवाहिका येण्यास उशीर : अजित गव्हाणे
शुक्रवारी (दि. ८) तळवडे येथील शोभेचे फटाके बनविणार्या कंपनीला आग लागली. तेव्हा तळवडे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अग्निशामक दलाची वाहने व रुग्णवाहिका वेळेत पोहचल्या नाहीत. त्यामुळे मोठी हानी होऊन अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला. अक्षरशः काही जखमी रुग्णांना खासगी वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे महापालिकेने पर्यायी भक्ती शक्ती चौक ते तळवडे आयटी पार्क चौक मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केले.

भक्ती शक्ती चौक ते तळवडे आयटी पार्क चौक असा बाह्य वळण रस्ता सुरू होणे हाच पर्याय : पंकज भालेकर
त्रिवेणीनगर, तळवडे भागात वाहतूक समस्येला स्थानिक नागरिक व वाहनचालकांना दररोज सामोरे जावे लागत आहे. पिंपरी चिंचवड शहर व चाकण MIDC ला जोडणारा तळवडे निगडी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर ४० फुट व त्यापेक्षा लांबीची वाहने व कंटेनर यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे ३ किमीच्या प्रवासाकरीता कधी कधी २ ते ३ तास वाहतुक कोंडी होत असते. यासाठी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत भक्ती शक्ती चौक ते तळवडे आयटी पार्क चौक असा बाह्य वळण रस्तासाठी काही जागा संरक्षण विभागाकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. असे नगरसेवक पंकज भालेकर यांनी सांगितले.
बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असते. नो पार्किंग किंवा रस्त्यावर वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीला अनेकांना सामोरे जावे लागते. काही वेळा ॲम्ब्युलन्सला देखील जागा काढताना नाकी नऊ येते. ज्योतिबानगर चौक, तळवडे, त्रिवेणीनगर चौक, तळवडे आयटी पार्क, निगडी- तळवडे-चिखली मार्गावर दररोज वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना अपघात घडत आहेत. शनिवारी (दि. ९) तळवडे चौकात एका महिला दुचाकी चालकाला अपघात घडून अवजड वाहनाखाली आल्याने आपला जीव घमवावा लागला आहे. महापालिका प्रशासन अजून किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर उपाययोजना करणार आहे, असा प्रश्न स्थानिक नगरसेवक तळवडे ग्रामस्थ करत आहेत.




