- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मा. नोंदणी महानिरिक्षण व मुद्रांक नियंत्रक यांना दिले कारवाईचे आदेश
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या विकास योजनेतील रस्ते व आरक्षणे विकसित करताना शेतकऱ्यांना जागेची नुकसान भरपाई अथवा टी. डी. आर. देण्याची तरतुद आहे. तळवडे भाग हा देहूरोड लष्कर हद्दीलगत येत असल्यामुळे तळवडे चिखली शिवरस्त्यावर विकसित होणाऱ्या रस्त्याला रेडी रेकनर देताना भिन्नता दिसून येते. तळवडे भागासाठी रेडी रेकनर दर इतर भागाच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे २०२४-२५ आर्थिक वर्षात रेडी रेकनर दरात सुधारणा करत समानता आणण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी केली आहे.
शहरातील आरक्षणे विकसित होताना नुकसान भरपाई देताना तळवडे भागावरती कायम अन्याय होत आहे. शहरातील इतर भागांच्या पटीत महापालिकेने नुकसान भरपाई तळवडे भागातील शेतकऱ्यांनाही द्यावी. एकच रस्त्याच्या चिखली भागासाठी एक न्याय व दुसऱ्या भागात येणाऱ्या तळवडे मधील नागरिकांसाठी वेगळा न्याय का? तळवडेकरांना महापालिकेतुन मिळणाऱ्या सुख सोयींचा नेहमीच अभाव असतो. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जमिनीचे रेडी रेकनरचे दरही वाढवावे, यासाठी पालकमंत्री यांच्यासह मा. नोंदणी महानिरिक्षण व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे भा.प्र.से. हिरालाल सोनावणे यांना याबाबतचे पत्र दिले आहेत.

काय आहे खरी वस्तुस्थिती…..
तळवडे व चिखली गावचा काही परिसर देहू अॅम्युनिशन डेपोच्या २००० यार्डाच्या परिघात (रेड झोनमध्ये) येत आहे. त्यामुळे तेथे कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नसल्याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आदेश पारित करणेत आलेले आहेत. तळवडे परिसरातील आरक्षणे व रस्त्याच्या भूसंपादनापोटी मिळणारी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अतिशय कमी मिळत आहे. तळवडे व चिखली गावच्या सीमेवरील एकाच रस्त्याच्या भूसंपादनाकरीता तळवडे व चिखली गावच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये दूजाभाव दिसत आहे. याच रस्त्यात बाधित शेतकऱ्यांना तळवडे भागाच्या तुलनेत चिखली गावच्या शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा अधिक फायदा होत आहे. त्यामुळे शेतकरी आरक्षणे विकसित करण्यास जागा देताना अनुकूलता दाखवितात. प्रसंगी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत.
यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तळवडे व चिखली मधील जमिनींच्या रेडीरेक्ररचे दरामध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुधारणा करताना समानता आणावी. शहराच्या विकासात वाटचाल करणाऱ्या तळवडे व चिखली मधील महापालिका व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सर्व टीडीआडीरेकनर दरामध्ये शहराच्या इतर भागाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंकज भालेकर यांनी केली आहे.




