पिंपरी : दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाला टाळे लागले आहे. कार्यालयाचे भाडे कोण देणार? त्याची जबाबदारी कोण घेणार? यावरून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखविले. परिणामी, दोन वर्षांतच कार्यालय बंद करण्याची नामुष्की ओढावल्याचे सूत्रांनी सांगितले.
मागील पंचवार्षिकमध्ये मनसेचा महापालिकेत एकमेव नगरसेवक होता. निगडीतून निवडून आलेले सचिन चिखले शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या पुढाकाराने महापालिका इमारतीसमोरील व्यापारी संकुलात मनसेचे सुसज्ज असे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते दि. १० मार्च २०२२ रोजी झाले होते. महापालिका निवडणूक नियोजित वेळेत होईल हे गृहित धरून कार्यायल सुरू केले. राज्यस्तरावरील नेते कार्यालयात बैठक घेत होते. परंतु, महापालिका निवडणुका लांबल्या.




