पिंपरी । प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. अशावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ९४१ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळल्याने पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या वतीने भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख , भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, माजी नगरसेविका माया बारणे, सुमनताई पवळे, संगीता कोकणे, नारायण बहिरवाडे, प्रसन्ना डांगे, प्रसाद कोलते, प्राचार्य लोबो सर, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटचे फाउंडर रमणप्रीत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमारे ४ हजार युवकांचा सहभाग…
या मेळाव्यात ४ हजार तरुणांनी सहभाग घेतला. २ हजार ८०० हून अधिक पदवीधर युवकांनी ऑनलाईन मुलाखतींसाठी नोंदणी केली, तर ८७६ युवकांनी प्रत्यक्ष मेळाव्यात विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या आहेत. त्याद्वारे ९४१ पदवीधरांना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. बहुतांश उमेदवारांना ‘ऑफर लेटर’ उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे काही उमेदवारांना तीन-तीन ऑफर भेटल्या आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार असून, त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.



