पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थरमाईक चौकातील थर्मॅक्स कंपनी लगत अनधिकृत बांधकाम, पत्राशेड यावर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई गुरुवारी (दि.२६ मे २०२२) रोजी तात्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली होती. मात्र पुन्हा या ठिकाणी अनाधिकृत पत्राशेड व बांबू लावून जागा हडपण्याचा प्रयत्न काही नागरिक करत आहेत.
निगडी भोसरी रोडवर थरमॅक्स कंपनी भिंती लगत काही जागा शिल्लक आहे. यावरती काही भागात महापालिकेने सुलभ शौचालय उभारले आहे. तर उर्वरित जागेवरती परिसरातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले होते. यावरती कारवाई करून ते जमीनदोस्त करून त्या ठिकाणी डांबरीकरण करून वाहनांना ये जा करण्यासाठी रस्ता बनविला आहे.
या ठिकाणी काही लोकांनी रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत अनधिकृतपने उभारण्यात आलेले हॉटेल्स, दुकाने, टपऱ्या यावरती पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही महिने या ठिकाणी कोणतेही अनधिकृत अतिक्रमण झाले नाही. मात्र मागील काही दिवसापासून पुन्हा पत्रा शेड उभारून या ठिकाणी झेरॉक्स मशीन सेंटर अशा आशयाचे बोर्ड लावून जागा बळकवण्याचा प्रयत्न काही जणांकडून करताना दिसत आहे.
या भागात काही थरमॅक्स कंपनीच्या भिंतीवरती काही सूचना लिहल्या आहेत….
—————————————
सुचना
या मिळकतीबावत मे. उच्चन्यायालय सदर जागा ताबा वहिवाट मिळकत (हायकोर्ट) मुंबई व पिंपरी दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. श्री. बाबासाहेब कांबळे विरुध्द पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे सुरू आहे. सदर मिळकत जागेवर अतिक्रमण कोणीही करू नये अन्यथा अतिक्रमण केल्यास कारवाई केली जाईल.
हुकुमावरून…..
शहरात अनेक भागात असे भूखंड मोकळे आहेत. या भूखंडाचे खरे मालक कोण आहेत? असा प्रश्न या सूचनेवरून पडत असतो. कारण ज्यांच्या मध्ये हा वाद सुरू आहे त्यांच्या नावावरती कोणतेही खरेदी खत अथवा सातबारा नाही तरीही ते अधिकार गाजवताना दिसून येतात. जवळपास आठ ते दहा गुंठे एवढा मोठा करोडो रुपयांचा प्लॉट रिकामा आहे. या ठिकाणी दररोज दिवसभर उन्हात वाहतूक पोलीस उभे असतात. याच ठिकाणी निगडी येथील वाहतूक पोलीस शाखेची इमारत याठिकाणी उभारून हा वाद कायमचा निकाल काढावा असा सूर स्थानिक नागरिकांच्या मधून होताना दिसत आहे.



