पिंपरी : थरमॅक्स चौक ते आकुर्डी रस्त्यावर गरवारे टेक्निकल फायबर नावाची कंपनी आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते आणि याच रस्त्यावर कंपनीचे मटेरियल गेट आहे. गेट समोर कंपनीमध्ये आलेल्या एका ट्रकच्या धडकेने महिलेचा जागेवरती मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवार दिनांक २३ मार्च रोजी दुपारी १२ च्या दरम्यान झाली. त्यानंतर तिला वायसीएम रुग्णालयात रिक्षाने हलवण्यात आले, मात्र तिला मृत घोषित केले.
वंदना सुरेश भोसले वय 51 वर्षे राहणार अजंठा नगर असे मृत महिलेचे नाव आहे. सदरची महिला कामानिमित्त रस्त्याने पायी चालत जात होती. याचवेळी कंपनीमध्ये साहित्य घेऊन येणारा ट्रक याने डावीकडील बाजूने महिलेला धडक दिली. कंपनीत आलेला आयशर ट्रक क्रमांक DD 03 R 9486 याने महिलेला कंपनीत प्रवेश करताना धडक दिली. ही घटना कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. घटनेनंतर उशिरा रात्री ८:४० वाजता निगडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
यावेळी कंपनीच्या सुरक्षा वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी आमचे सुरक्षा रक्षक वाहने आत बाहेर काढताना लक्ष देत असतात असे सांगितले. तसेच कंपनीत असणारी रुग्णवाहिका सदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी वापरता आली नाही. कंपनीचे नियमाप्रमाणे कंपनीमधील कामगारांनाच अपघात समयी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येतो असे सांगितले. मात्र, या सर्व घटनेतून कंपनीच्या सुरक्षा विभागाचा व कंपनीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीकडून कोणतीही सुविधा पुरविण्यात येत नसल्याचे दिसून आले.
वंदना सुरेश भोसले या महिन्याच्या नोकरीवरतीच घराचा उदरनिर्वाह होत होता. तिच्या पाठीमागे दोन लहान मुले व एक मतिमंद मुलगा आहे. त्यामुळे घरचा कमावता व्यक्ती मृत पावल्याने भोसले कुटुंब उघड्यावरती पडणार आहे. त्यामुळे या महिलेच्या कुटुंबासाठी गरवारे कंपनी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मदत करणे गरजेचे आहे.
मुख्य रस्त्यावरील कंपनीचे मटेरियल गेट बंद करावे….
कंपनीतून उत्पादित होणारा माल व कच्चा माल याचा करण्यासाठी दररोज अनेक ट्रक कंपनी बाहेर उभे असतात. मुख्य रस्त्यावर लांबच्या लांब रांगा लावून वाहने उभे असल्याने वाहन चालकांना याचा नेहमी त्रास होतो. कंपनीमध्ये अनेक ट्रक रस्त्यावरतीच अनधिकृतपणे पार्किंग करत असतात. कंपनीतून रस्त्यावरती येणारा ट्रक आत बाहेर करताना कोणताही सुरक्षा रक्षक कंपनी कडून पुरवण्यात येत नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कंपनीचे गेट तात्काळ बंद करून अंतर्गत रस्त्याच्या मार्गाने सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




