महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.23 एप्रिल) रोजी दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. वाघेरे यांच्याकडे एकूण 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असून त्यांच्यावर दोन कोटी 98 लाख 32 हजारांचे कर्ज आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे 4 कोटी 46 लाख 36 हजार 494 रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 89 लाख 63 हजार 115 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. संजोग वाघेरे यांच्याकडे 6 कोटी 85 लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे 5 कोटी 20 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.वाघेरे कुटुंबियांकडे स्थावर आणि जंगम अशी एकूण 18 कोटी 44 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
तसेच,संजोग वाघेरे यांच्याकडे 351 ग्रॅम वजनाचे 21 लाख 76 हजार 571 रुपयांचे दागिने आहेत.त्यांच्याकडे एक लाख 54 हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आहे. दरम्यान,वाघेरे यांच्यावर 64 लाख 48 हजार 271 रुपयांचे तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्यावर 2 कोटी 33 लाख 84 हजार रुपयांचे कर्ज आहे.
श्रीरंग बारणे कोट्यधीश; 106 कोटींची संपत्ती
खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली असून बारणे यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण 106 कोटी 55 लाखांची मालमत्ता आहे.
बारणे यांचे शेती, बांधकाम व्यावसाय आणि वीट कारखाना हे व्यवसाय असून त्यांची मावळ तालुक्यातील पाचाणे, मुळशी तालुक्यातील मारुंजी आणि माणमध्ये शेतजमीन आहे. याशिवाय ताथवडे, चऱ्होली आणि थेरगाव येथे पाच ठिकाणी बिगर शेतीजमीन असून थेरगावमध्ये तीन निवासी आणि व्यावसायिक इमारती देखील आहेत.
श्रीरंग बारणे यांच्या विविध बँकांमध्ये मुदत ठेवी, बचत ठेवी, शेअर्स, विमापत्रे आणि भागभांडवल आहेत. तसेच,त्यांच्याकडे मर्सिडीस बेंझ आणि टोयाटो फॉरच्युनर या दोन गाड्या व्यतिरिक्त 11 लाख 55 हजारांचे हिरे तर 32 लाख 50 हजारांचे 470 ग्रॅम सोने असून एक रिव्हॉल्व्हर देखील आहे. बारणे यांच्यावर 44 लाख रुपयांचे वाहन कर्ज असून वेगवेगवेळ्या संस्थाचे 41 लाख असे एकूण 85 लाखांचे कर्ज आहे. खासदार असताना बारणे यांनी दहावीची परीक्षा चिंचवड येथील फत्तेचंद जैन विद्यालयातून मार्च 2022 मध्ये दिली होती व त्यापरीक्षेत ते उत्तीर्ण झाले आहेत.




