वडगाव मावळ: लोकसभा निवडणूकीचा निकाल येण्यापूर्वीच एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पराभव झाला तर त्याला भाजप नेते चंद्रकांत पाटील जबाबदार असतील असं म्हटलं होतं. आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडलय. त्यानंतर अजित पवार यांच्या आमदारांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल हाती येण्यापूर्वीच महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर खापर फोडण्यास सुरुवात केली आहे.
श्रीरंग बारणे काय म्हणाले होते?
काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही. मी याची लिस्ट अजितदादांकडे दिली होती. निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. पण सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झालं असतं. महायुतीचे सहा विधानसभा मतदारसंघात आहेत, त्या सर्व मतदारसंघातील आमदारांनी माझं काम केलं आहे, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं होतं.
अजितदादांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आमदारांनी चांगल काम केलं. पण काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. 100 टक्के कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर संजोग वाघेरेंचे डिपॉझीट जप्त झाले असते. काही कारणास्तव खालचा कार्यकर्ता दुखावला होता. त्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांमुळे मतांवर काही मतांवर परिणाम होईल, असंही श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलंय.
सुनील शेळकेंकडून जोरदार प्रत्युत्तर
आमदार सुनील शेळके म्हणाले, मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे. तसे आदेश आम्हाला आमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षांनी दिले होते. आम्ही काम देखील केलं आहे. पार्थ पवार स्वतः याठिकाणी थांबले होते आणि आम्ही प्रचार केला आहे. बारणे यांच्याकडून खापर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या विषयी मतदारांमध्ये नाराजी होती हे त्यांनी आता मान्य केलं पाहिजे, असं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.




