
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांच्यासह सहाजणांना सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी शुक्रवारी दिले. सहा जणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
आरोपींना तपासासाठी सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी केली होती. न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून आरोपींना १४ दिवस न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणात जामीन मंजूर करण्यात यावा, यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन, तुकाईदर्शन, हडपसर), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा), ब्लॅक पबचे वस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी (२४ मे) संपली. त्यानंतर त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.




