
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबा सध्या अटकेत आहेत. पण या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले आहे.
रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. श्रीहरी हळनोरचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचेही रक्त नमुने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, ज्यावेळी रक्त चाचणी घेण्यासाठी रक्त घेतले गेले, तेव्हा आरोपीच्या आई रुग्णालयात हजर होत्या. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्तींनी फोनवरून दबाव आणल्याने डॉ. हरनोळ यांनी सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन तीन व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेतले. त्यापैकी एक रक्त नमुना आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांचा होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी पोलीस शिवानी अग्रवालचा शोध घेत आहेत.




