पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षांपूर्वी पडलेली फूट, त्यानंतर एकमेकांवर केले गेलेले असली-नकलीचे आरोप, सत्तेसाठी नेत्यांनी मारलेल्या उड्या, भाजपाने एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच पक्षात घेतल्यामुळे पसरलेली नाराजी, या सर्वांचा परिणाम एकूणच मतदानावर झाला असावा, असा कयास एक्झिट पोल पाहून बांधला जात आहे. महायुतीला २०१९ च्या निवडणुकीत ४१ जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत एकाही एक्झिट पोलने त्यांना ४० पेक्षा अधिक जागा दाखविलेल्या नाहीत.
सांगलीत ‘मशाल’ नव्हे तर ‘विशाल’
सांगलीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली होती. त्यावरुन काँग्रेसची नाराजी निर्माण झाली होती. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
बारामतीकरांचा कौल लेकीला?
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचे एक्झिट पोलद्वारे सांगितले जात आहे.
साताऱ्यात उदयनराजेंना पुन्हा धक्का एक्झिट पोलनुसार शिंदे आघाडीवर
टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, साताऱ्यात पुन्हा एकदा धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. २०१९ साली पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. यंदाही एक्झिट पोलनुसार उदयनराजे पिछाडीवर दाखवत आहेत. तर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
महायुतीला किती जागा मिळणार?
एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ पैकी १७, शिवसेना शिंदे गटाला १५ पैकी ६ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला ४ पैकी १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा एकूण ४८ पैकी २४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीला किती जागा?
एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात शिवसेना उबाठा गटाला २१ पैकी ९ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० पैकी ६ जागा, तर काँग्रेसला १७ पैकी ८ जागांना विजय मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा एकूण २३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
२०१९ मध्ये महायुतीने किती जागा जिंकल्या?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात ४१ जागांवर विजय मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने ४ ठिकाणी विजय मिळविला होता. तर काँग्रेसने १, एमआयएम १ आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या होत्या.




