पिंपरी : हिट ऍण्ड रन प्रकरणांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिस हलगर्जीपणा का दाखवतायेत? गुन्हा दाखल करण्याऐवजी डोळेझाक का करतायेत? असे प्रश्न उपस्थित झाले. मोशीतील या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही बातम्यांमध्ये झळकले अन् उपस्थित प्रश्नांची उत्तरं ही मिळत गेली. कारण यातील कार चालक हा पोलिसांचा मुलगा असल्याचं आता समोर आलंय. त्यामुळंच इतका भीषण अपघात होऊनही पोलिस झोपेचं सोंग का घेत होते याचं उत्तर ही मिळालं. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड पोलिसांचा आणखी एक ‘कार’नामा समोर आला आहे.
आरोपी ड्रायव्हर निघाला पोलिसाचा मुलगा
विनय नाईकरे असं या आरोपी चालकाचे नाव आहे. तो पोलीस हवालदार विलास नाईकरे यांचा मुलगा असून ते सध्या भोसरी एमआयडीसी पोलिसांत कार्यरत आहेत. याच पोलीस स्टेशनची हवा मुलगा विनयला खावी लागत आहे. मात्र यानिमित्ताने पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंच्या अखत्यारीत असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला जातोय.
विनय हा मोशीतील रस्त्यावर बेदरकारपणे कार चालवत होता. त्याचवेळी फिर्यादी यांची पत्नी आणि मुली या रस्ता ओलांडत होत्या. विनय मात्र त्याच्याच धुंदीत होता. कारण रस्ता ओलांडणाऱ्या फिर्यादीच्या कुटुंबीयांना विनयच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराने पाहिलं आणि आपला वेग कमी केला. मात्र विनय सुसाट वेगात आहे तसाच आला आणि त्याने फिर्यादीच्या पत्नीला धडक दिली.




