
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. भाजपाला २८ जागा लढवून अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही भाजपाची कानउघाडणी करण्यात आली. तसेच संघाच्या मुखपत्रातूनही भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पा-वले उचलण्यात आली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पुण्यात आमदारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ नये, यासाठी संघाने पावले उचलली आहेत.
त्यांनतर आता लोकसभेतील पराभवानंतर भाजपनेही ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहेत.
होमग्राऊंड राखू न शकलेल्या विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपकडून तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीपैकी भाजपने २८, शिंदे गटाने १५ आणि अजित पवार गटाने ४ जागा लढवल्या होत्या. त्यातील भाजपला ९, शिंदे गटाला ७ आणि अजित पवार गटाला एकाच जागेवर विजय मिळवता आला.




