
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५१ व्या वर्षारंभानिमित्त आज (२० जून) स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आयोजित विविध कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतला. स्वराज्यसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे, विचारांचे, पराक्रमाचे स्मरण करून स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या, जिवाची बाजी लावणाऱ्या सह्याद्रीच्या मावळ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्ण वंदन केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देशभरातील तमाम शिवप्रेमींना, शिवभक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज किल्ले रायगड सज्ज आहे. शिवभक्तांसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने सोयी-सुविधांची सज्जता केली आहे. तसेच, या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. प्रेरणा आणि ऊर्जेचा स्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी सकाळपासूनच दुर्गराज रायगडावर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.




