पिंपरी : लोकसभेच्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीचे वेध सुरू झाले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेला चिंचवड विधानसभेतून महायुतीला भरघोस मतदान मिळाल्यामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या झाली आहे.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक झाली. यामध्ये अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी विजय संपादन केला. पोटनिवडणुकी वेळी भाजपमधील अनेक जण इच्छुक होते. मात्र भाऊंच्या निधनानंतर ताईंना संधी मिळाल्यामुळे सर्वांनी माघार घेतली. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप उमेदवारीसाठी आग्रही असल्यामुळे भाजपमधील काही जेष्ठ नगरसेवकानी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
चिंचवड विधानसभा भाजपा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे म्हटले आहे. तर भाजप हा सुसंस्कृत पक्ष आहे, घराणेशाहीला पक्षांमध्ये थारा नसतो. पोटनिवडणुकी वेळी पुन्हा तुम्हाला संधी देऊ असे सांगून शांत राहिलेले… आणि “विकासाचे एकच नाते चंद्रकांत नखाते…” असा जोरदार प्रचार यंत्रणा राबविणारे ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
याचबरोबर पिंपळे सौदागर येथील मागील दशकापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर गेल्या दोन दशकापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करणारे थेरगाव येथील बारणे कुटुंबीयांमधील झामाताई बारणे व सिद्धेश्वर बारणे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटले आहेत.
भाजपमधील इच्छुकांची यादी
१) आमदार अश्विनीताई जगताप
२) शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप
३) नगरसेवक चंद्रकांत नखाते
४) नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे
५) नगरसेविका झामाताई बारणे
६) नगरसेवक सिद्धेश्वर बारणे
२००९ साली चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून जगताप कुटुंबियांचे वर्चस्व मतदारसंघावर आबादीत राहिली आहे. २००९ साली अपक्ष म्हणून आमदार लक्ष्मण जगताप पहिल्यांदाच निवडून आले त्यानंतर त्यांनी २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवत मतदारसंघ ताब्यात ठेवला. त्यांच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा जगताप यांच्यात कुटुंबाला साथ दिली व भाऊंच्या पत्नी अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांना पुन्हा आमदार म्हणून निवडले. मात्र, पोटनिवडणुकीत विजयाचे लीड 38 हजार पर्यंत खाली आले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवडकर पुन्हा जगताप कुटुंबाच्या मागे उभे राहणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार हेच पाहावे लागणार आहे.




