सातारा : मलकापूर (ता. कराड) येथील काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी मुंबईत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे कराड दक्षिणमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला मोठा धक्का बसला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती श्री. राजेंद्र प्रल्हाद यादव, माजी नगरसेविका सौ. अनिता राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती सौ. गीतांजली शहाजी पाटील, नगरसेविका सौ. स्वाती तुपे यांच्यासह मलकापुरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतुल भोसले यांचे यश मानले जात आहे. त्यातच मलकापूर नगरपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर शिंदे हे नेतृत्व करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक व मलकापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे या घडामोडीवरून दिसत आहे.