देहू : जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळयाने शुक्रवारी ( ता.२८ ) टाळ -मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात भक्तीमय वातावरणात दुपारी अडीच वाजता हजारो वारकऱ्यांच्या उपस्थीतीत तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
आज (शनिवारी ) प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हस्ते महाराजांच्या पादुकांचे पूजन झाल्यानंतर पालखी,दिंड्या,वैष्णवांच्या मांदियाळी भाविकांच्या लवाजवासह पालखी मार्गाने तीर्थक्षेत्र देहूतून तीर्थक्षेत्र पंढरपूर मार्गस्थ होईल आणि पिंपरी चिंचवड उद्योग नगरीतील आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी शनिवारी रात्री विसावणार आहे.

आनंदाचे डोही, आनंद तरंग ॥
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरीये वास ॥
पंढरीची ओढ असणाऱ्या हजारो भाविक भक्तांची पालखी सोहळयात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पुण्यनगरी देहूत आगमन झाले होते.पालखी सोहळयाची, वारीची परंपरा जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपूत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये सुरू केली. वारीचे हे ३३९ वे वर्ष आहे.
प्रस्थान सोहळयाच्या निमित्ताने पहाटे पासूनच वारकऱ्यांची लगबग सूरु होती. पहाटे प्रात विधि आटोपून इंद्रायणी नदी घाटावर स्नान संध्यासाठी भाविक वारकऱ्यांनी गर्दी केली होती. पहाटे पासूनच मुख्यमंदीरांत भाविकांनी दर्शनासाठी दर्शन बारीने रांगा लावल्या होते.
पहाटे काकड आरती नंतर शिळा मंदीर,श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदीर,पालखी सोहळयाचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदीर आणि वैकुंठस्थान मंदीरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे,विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते संस्थानचे आजी-माजी विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली.
जेष्ठ वारकरी कीर्तनकार पंढरीनाथ महाराज तावेर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनेत्रा अजित पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, उमा खापरे यांच्या हस्ते जगदगुरुंच्या पादुकाचे महापूजा करण्यात आली.
मानकरी,विणेकरी यांचा फेटा,श्रीफळ देऊन संस्थानच्या वतीने सन्मान झाले. टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळयाचे प्रस्थान झाले. खांदेंकऱ्यांनी पालखी खाद्यांवर घेताच भाविकांनी “पुंडलिका वरदा हरि विठ्ठल” नामाचा जयघोष केले.पालखी मंदीरातुन बाहेर आणली.
सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणानंतर देहूतील इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पालखी इनामदार वाड्यात विसावली. पालखी आरती नंतर रात्री ९ ते ११ वाजे.पर्यंत म्हातारबुवा खणेपुरीकर दिंडीचे किर्तन होऊन पहाटे पर्यंत वेणूरकर दिंडीचे जागर सुरू होते.
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥ १ ॥ वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ ध्रु. ॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥ २ ॥ तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥ ३ ॥
या अंभगाने भजनी मंडपामध्ये सकाळी १० ते १२ भानुदास महाराज मोरे यांचे काल्याचे किर्तनानी सांगता झाले. दरम्यान सकाळी ११ वा. घोडेकर सराफ यांच्याकड़ील पॉलीश करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंरपराप्रमाणे कैलास सोंळूके ( गंगा म्हसलेकर ) यांनी डोक्यावर घेवून टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम हरीनामाच्या जयघोषात दिंडयाच्या लवाजमात इनामदार वाडयात आणल्या.दिलीप गोसावी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन झाले.
दुपारी साडे बाराच्या सुमारास सोंळूके यांनी महाराजांच्या पादुका डोक्यावर घेवून टाळ मृदंगाच्या गजरात मुख्य मंदीरात मंदीर आणल्या.मंदीर प्रदक्षिणानंतर पादुका भजनी मंडपात आणले.दुपारी दोनच्या सुमारास वाजता पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ झाले.




